नानक नाम जहाज है.

नानक नाम जहाज है.....

 भारत ही साक्षात्कारी संतांची खाण आहे. राजसत्तेच्या विरोधात

सर्वसामान्य लोकांच्या मनातील आक्रोशाला अनेकदा या साक्षात्कारी

संतांनी आवाज दिलाय. इतकेच नव्हे तर प्रस्थापित धर्मसत्तेच्या

विरोधातील लढाईत, समतेच्या, न्यायाच्या लढ्यात अनेक अध्यात्मिक

चळवळी उभ्या राहिल्या.याच अध्यात्मिक चळवळी समाजात स्थिर

झाल्यावर कालांतराने विषमतावादी, रूढीवादी व्यवस्था त्यांना

स्वीकारल्याचा देखावा निर्माण करते आणि गिळंकृत करू पाहते. 

भारतात उभ्या राहिलेल्या अनेक समतावादी प्रवाहांतील एक

महत्वाची धारा म्हणजे गुरु नानकांनी सुरु केलेला हा शीख धर्म . 

काल संध्याकाळी (३ जून रोजी) सहा वाजता मैत्री सद्भावना ग्रुपची

अभ्यास चर्चा बैठक सीमा मालानी यांच्या घरी पार पडली.

या मिटिंग मध्ये निशा शिऊरकर, शिवाजी गायकवाड, आर्किटेक्ट अमोल

सांगळे, विनोद भोईरडॉ इरफान अली, नम्रता पवार व मी डॉ अमित

शिंदे उपस्थित होतो. 

काल शीख गुरू अर्जुनदेव यांचा शहीद दिवस असल्याने शीख

धर्म, गुरू नानक, शिखांचे योगदान व गुरू अर्जुन देव यांचे हौतात्म्य या

विषयावर चर्चा झाली. 

सीमा मालानी यांनी साहित्य अकादमी कडून प्रकाशित झालेल्या

‘भारतीय साहित्याचे निर्माते- गुरू नानक’ 

 या गुरुबचन सिंह तालिब यांच्या पुस्तकावर विवेचन केले. त्यात मुख्यतः

गुरू नानक यांचे थोडक्यात चरित्रत्यांच्या रचनेत समर्पण, करुणा,

सामाजिक, नैतिक जाणिवा याविषयी त्या बोलल्या व उदाहरण दाखल

त्यांनी गुरू नानक विरचीत एक सुंदर रचना तिच्या भावार्थासह

समजावून सांगितली. 

गुरु नानक यांचे वडील एक पटवारी (महसूल खात्यातील एक कनिष्ट

कारकून) होते. लहानपणी खेळताना नानक नेहमी गरीब आणि

तथाकथित हीन जातीतील मुलांची निवड करीत. त्यांनी आपल्या

हयातीत हरिद्वार, वाराणसी,पुरी या हिंदू तीर्थस्थळे तसेच मक्का,

मदिना या मुस्लीम तीर्थास्थाळांचीही यात्रा केली होती. त्यांच्या

 शिष्यांत हिंदू मुस्लीम सर्वांचा समावेश होता. त्यांनी अत्यंत अलंकारिक

तसेच रागदारीवर आधारित काव्य लिहिले. त्यात तत्कालीन राजकारणाचे,

समाजव्यवस्थेचे चित्रण आहे. बाबरने केलेल्या हिंदू मुस्लीम कत्तलीचे

चित्रणही आहे.समाजातील विषमता, अन्याय यांचेही वर्णन आहे. 

त्यानंतर श्री विनोद भोईर यांनी माया भोईर यांनी लिहिलेले गुरू नानक

यांच्यावरील टिपण वाचून दाखविले, हे टिपण मुख्यतः रामकृष्ण मिशन

द्वारा प्रकाशित गुरू नानक या पुस्तिकेवर आधारित होते. त्यात गुरू

नानक यांचे चरित्र व शिकवण यावर प्रकाश टाकला होता. हे टिपण

सर्वांनाच खूप आवडले व सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. 

नानक यांनी हिंदू योग्यांबरोबर तत्वचर्चा केल्या तसेच मुस्लीन संतांशीही

विचारविनिमय केला. बाला आणि मर्दना असे त्यांचे दोन साथीदार शिष्य

होते. त्यातील बाला हा हिंदू आणि मर्दना हा मुस्लीम होता.

गुरु नानाकांनी कर्मकांडावर आणि अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केले.

लहानपणी त्यांची मुंज होणार होती. पण बंडखोरी करून त्यांनी ती

नाकारली.

“दया हा कापूस असू दे...समाधान हा धागा असू दे... संयमाची गाठ

मारून सत्याचा पिळ मारून त्याचे जाणवे बनव आणि मला दे.” असे ते

म्हणत.

डॉ अमित शिंदे यांनी गुरू नानक यांच्या 'वाटून खावे, नैतिक

आचरण ठेवावे व नामस्मरण करावे'  या साध्या शिकवणीची

चर्चा केली. साधी, सोपी शिकवण व आचरणास सोपा धर्म हे वारकरी

संप्रदायाशी शीख धर्माचे साम्य आहे. तसेच नानक हे कवी होते.

जवळपास सर्वच भारतीय संत कवी होते. नानकांच्या कवितेत

 ज्या प्रियकर प्रेयसीच्या प्रतिमा येतात, रत्नाचा मंचक इ. वर्णने येतात

त्यावरून विरक्तीतही रसिकत्व जिवंत ठेवता येते हेच सिद्ध होते. सर्व

वारकरी संतांनी लोकभाषेत रचना केल्या. नानकही संस्कृत पंडित होते.

वेद आणि शास्त्राचे व्यासंगी होते. रागदारी, संगीत याच्याशी त्यांचा

परिचय होता. पण त्यांनी मुख्यतः गुरुमुखीत सोप्या भाषेत रचना केल्या.

तसेच काही रचना फारसीतही केल्या. याबाबतही ते वारकरी संतांचे भाऊ

ठरतात.

  या बैठकीला प्रथमच आलेल्या डॉ इरफान अली यांनी शीख धर्मातील

लंगर इ. प्रथांचे सुफी पंथातील परंपरेशी साधर्म्य आहे असे निरीक्षण

नोंदवले.  लंगर या प्रथेचा जातीभेद नष्ट करण्यात मोठाच वाटा आहे. 

अमोल सांगळे यांनी गुरुद्वाराचे अर्चिटेक्चर मंदिर व मस्जिद यांच्या

समन्वयातून निर्माण झालेले आहे असा दृष्टिकोन मांडला. बाहेरून

आडदांड आणि थोराड दिसणारे शीखही गुरुद्वारात नम्रपणे संगत सेवा

करतात. भांडे धुतात. करोडपती व्यक्तीही तिथे लोकांच्या चपला

पुसण्याची सेवा करतात. खरोखर हे जाती, वर्ण विरहित समाजाचेच

एक मॉडेल आहे.निशाताईंनी 'शीख धर्मातील धर्मनिरपेक्ष

जाणिवा' या करतार सिंग दुगगल यांच्या पुस्तकाचा अनुवाद 

आ. ह. साळुंखे यांनी केलेला आहे त्याबद्दल  माहिती दिली. यात गुरू

नानकांनी स्वतःची गादी आपल्या मुलाला न देता शिष्यांमधून योग्य

शिष्याची निवड केली व घराणेशाही नाकारली याबाबद्दल तसेच गुरू

अर्जुन देव यांच्या हौतात्म्याच्या वेळेस देखील त्यांनी आपली मनःशांती

ढळू न देता मृत्यूला सामोरे गेले याविषयी सांगितले.यानिमित्ताने विविध

मुघल राज्यकर्ते व तत्कालीन वेगवेगळे शीख गुरू यांच्यातील चांगले वाईट

संबंध, शत्रुत्व,  शिखांचे स्वातंत्र्य प्रेम या विषयी प्रत्येकानेच आपापले मत

मांडले.अकबर आणि गुरु अर्जुनदेव यांचे संबंध मैत्रीचे होते. अमृतसरला

येऊन अकबराने गुरूंची भेट घेतली होती, त्यांना अनेक देणग्या दिल्या

होत्या, त्या भागातील शेतसारा गुरूंच्या शब्दाखातर माफ केला होता.

अमृतसर मंदिराच्या पायाचा दगड एका मुस्लीम संताच्या हस्ते बसवला

गेला होता. अकबरानंतरच्या मुघल बादशाहांचेही गुरूंशी संबंध 

कधी प्रेमाचे तर कधी शत्रुत्वाचे असे संमिश्र राहिले होते इ. अनेक

अपरिचित बाबी यानिमित्ताने कळल्या. 

‘शीख धर्मात निर्माण झालेले सशस्त्र पंथ’ हा गुरू नानकांच्या मूळ धर्माचा

भाग नव्हता मात्र ते पंथ नंतरच्या राजकीय पार्श्वभूमीतून उदयाला आले

असा निष्कर्ष या चर्चेतून निघाला. 

शिवाजी गायकवाड यांनी वेगवेगळ्या गुरुद्वारांना दिलेल्या भेटी, त्यावेळचे

अनुभव व संत नामदेवांचे शीख समाजाशी असलेले नाते, नामदेवांच्या

जन्मस्थानी असलेला गुरुद्वारा, भारतीय स्वातंत्र्य लढा, सैन्य यातील 

शिखांचे योगदान, त्यांचे देशप्रेम, फाळणीच्या जखमा इ. विविध अंगांनी

विवेचन केले. शीख कधीही कुठल्या राजसत्तेचे अंकित झाले नाहीत.

कारण आपल्या उत्पन्नाचा एक दशांश भाग ते लंगर, गोरगरिबांना मदत

यासाठी वापरतात. तसेच गुरु गोविंदसिंग यांच्या निधनानंतर पवित्र ग्रंथालाच

गुरुत्व देण्यात आले. मानवी गुरूप्रमाणेच या ग्रंथाला भेट अर्पण केली जाते.

या ग्रंथात विविध जाती धर्म व्यवसाय असलेल्या संपूर्ण भारतातील

छत्तीस संतांच्या रचना आहेत. त्यामुळे गुरु ग्रंथसाहेब हा सर्वधर्मीय,

सर्वसमावेशक ग्रंथ आहे. असा ग्रंथ निर्माण होणे हाच विषमतेला, जातीय,

वर्गीय अहंकाराला जोरदार तडाखा आहे. एक क्रांतिकारी घटना आहे.

याशिवाय आधुनिक राजकारणात शीख धर्माचे स्थान, शीख हा स्वतंत्र धर्म
नसून हिंदू धर्माचा भाग आहे असे मांडण्याचे, शिखांना प्रतिगामी गटात
ओढण्याचे विविध प्रयत्न, शिखांची हेतुपुरस्सर उडविण्यात येणारी खिल्ली,
 खलीस्तानची चळवळ, शिखांच्या काही गटांत घुसलेल्या प्रतिगामी प्रवृत्ती,
नानकांनी पुरोहितशाहीला दिलेला नकार आणि गुरुबानी या भाषेचा केलेला
पुरस्कार यातून दलित, हिंदू , मुस्लिम सर्वच थरांत नानकांनी मिळविलेले
 विशेष स्थान याची चर्चा झाली. पुढील मिटिंग ही 17 जून रोजी अमोल
सांगळे यांच्याकडे घ्यायची असे ठरले 
असून त्यादिवशी गोपाळ गणेश आगरकर यांची पुण्यतिथी तसेच राजमाता
स्वराज्यसंकल्पिका जिजाऊ यांची तिथीनुसार जयंती असल्याने याविषयावर
वाचन करून चर्चा करायचे ठरले आहे.

 

टिप्पण्या