महर्षी

 
 
 

जाती अंताचे अग्रदूत

महर्षी 

विठ्ठल रामजी शिंदे 


 "कोण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे? मी हे नाव पहिल्याच ऐकतोय." तरुण मित्र म्हणाला.

अस्पृश्यता  निवारण आणि जाती अंतासाठी इतके प्रचंड काम केलेल्या व्यक्तीची माहिती तरुण पिढीला नसावी ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे.

म्हणूनच गेल्या शुक्रवारी एक जुलै रोजी निशा शिवूरकर आणि शिवाजी गायकवाड यांच्या मैत्री या निवास्थानी झालेल्या बैठकीला हाच विषय घ्यावा असे ठरले. 

या बैठकीला अनिल शिंदे, शिवाजी गायकवाड, निशा शिवूरकर, विनोद भोईर, प्रा. प्रवीण मेहेत्रे, विना मेहेत्रे आणि डॉ अमित शिंदे उपस्थित होते.

डॉ अमित शिंदे यांनी  'विसाव्या शतकातील मराठी गद्य' या साहित्य अकादमीकडून प्रकाशित आणि भास्कर लक्ष्मण भोळे संपादित पुस्तकातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे लिखित 'तत्वज्ञान आणि समाजशास्त्र' हा निबंध तसेच मुंबई विद्यापीठाच्या बी ए द्वितीय वर्ष अभ्यासक्रमातील पुस्तकातील विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेल्या "समाजसुधारणा यशस्वी का होत नाहीत?' या लेखाचे वाचन करून त्यातील निवडक भाग अधोरेखित केला होता.

विठ्ठल रामजी शिंदे हे समाजसुधारक होतेच मात्र जातींची निर्मिती कशी झाली या विषयावर त्यांनी मुलभूत संशोधन केले होते. हे संशोधन अंतरशाखेय आहे. धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, प्राचीन वास्तुशास्त्र, मानववंश शास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र अशा अनेक अंगांनी त्यांनी जातीच्या प्रश्नाचा अभ्यास केला आहे. 

भारतात प्राचीन काळानंतर नवे तत्वज्ञान निर्माण होण्याची प्रक्रिया थांबली. नवा विचार मांडण्याऐवजी जुन्याच ग्रंथांवर भाष्य लिहिण्याची प्रथा शंकराचार्यानंतर रूढ झाली. नवे विचार युरोप आदी प्रदेशांत निर्माण होत गेले आणि भारत इंग्रजांच्या अगमनानन्तर या विचारांची फक्त एक उतारपेठ बनून राहिला आहे अशी खंत महर्षी शिंदे यांनी व्यक्त केली आहे. भारतात समाजशास्त्र या विद्या शाखेची वाढ होण्याचे मुंबई विद्यापीठाची स्थापना, परमहंस मंडळी, प्रार्थना  समाज, हे टप्पे नोंदवून पुढे सामाजिक सुधारणांच्या  विरोधी विचारांना टिळक, चिपळूणकर आदींमुळे कशी ताकद मिळत गेली हे ते नोंदवितात. सनातनी पक्षाचा उल्लेख जीर्णोद्धारपक्ष असा करून त्यांच्या ग्रंथांत प्रसंगी किती घाणेरडी भाषा वापरून ही मंडळी सुधारणावादी विचारांना विरोध करतात हे त्यांनी काही उतारे देऊन दाखवून दिले आहे. 

तसेच जातीसंस्थाच्या उदयाला ग्रामसंस्था, वतनपद्धती जबाबदार होती हेही त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. 

'समाजसुधारणा यशस्वी का होत नाहीत ?' या प्रश्नाला उत्त्तर देताना ते काही कारणे देतात. विविध सामाजिक परिषदा केवळ चर्चा आणि ठराव यांच्यावरच भर देतात, रचनात्मक काम करत नाहीत हे ते समाजसुधारणा यशस्वी न होण्याचे एक प्रमुख कारण म्हणून नोंदवितात. शिशुसंगोपन, कामगारकल्याण, महिला विकास आदी क्षेत्रात रचनात्मक काम केल्याशिवाय समाजसुधारणा यशस्वी होणार नाही  असे ते स्पष्ट सांगतात. याशिवाय समाजसुधारकांनी धर्म या संकल्पनेशी फारकत घेतली; हेही समाजसुधारणा समाजात सर्वदूर रुजू शकली नाही याचे एक महत्वाचे कारण आहे असे ते मांडतात. युरोपातील निधर्मी सुधाराकांचा आदर्श घेत भारतातही धर्मापासून तटस्थ राहून सामाजिक सुधारणा करता येईल अशी समजूत यामागे आहे असे ते म्हणतात. याबाबत ते महात्मा फुलेंचा सत्यधर्म, राजा राम मोहन रॉय यांच्या ब्राम्हो समाज आणि महात्मा गांधी यांनी धर्म न नाकारता केलेल्या सामाजिक कामांचे ते कौतुक करतात. तसेच सामाजिक सुधारणा हा शब्द आपण खूप मर्यादित अर्थाने घेतो. आर्थिक, वर्गीय, जातीय, राजकीय संदर्भ आपण विचारात घेत नाही हे ही समाज सुधारणा यशस्वी न होण्याचे एक कारण आहे असे ते मांडतात. तत्कालीन उच्चभ्रू समाजसुधारकांनी कामगार, श्रमिक वर्गाकडे दुर्लक्ष करून केवळ वरिष्ठ समाजात सुधारणेचा प्रयत्न केला हे त्यांच्या अपयशाचे एक कारण आहे.

यानानातर डॉ. अमित शिंदे यांनी 'महाराष्ट्रातील जातीसंस्था विषयक विचार' या यशवंत सुमंत आणि द. दि. पुंडे संपादित पुस्तकातील विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरील डॉ. सदानंद मोरेंच्या लेखातील काही निवडक भागाचे वाचन केले. "भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न." या पुस्तकात शिंदे यांनी सुमारे पस्तीस अस्पृश्य जातींच्या नावाचा व्युत्पात्तीशास्त्रीय मागोवा घेतला आहे. शिंदे यांनी यातील प्रत्येक जातीच्या वस्तीत दोन महिने ते एक वर्ष राहून त्यांचा पेहेराव, खाद्य, पेय, चालीरीती यांचा अभ्यास केला. आज अस्पृश असलेल्या जाती या पूर्वी बौद्धधर्मीय होत्या, राज्यकर्त्या होत्या, सामुदायिक अस्पृश्यता हे राजकीय हत्यार म्हणून विजेत्यांनी वापरले असा सिद्धांत त्यांनी मांडला आहे जो डॉ. आंबेडकरांच्या सिद्धांताशी खूपच मिळताजुळता आहे. आज जे जमिनीचे मालक आहेत ते मुळात उपरे होते, आणि आज जे विस्थापित जीवन जगत आहेत ते इथले मुळ जमिनीचे मालक होते. तसेच वतनपद्धती ही जातीव्यवस्थेला कारणीभूत झाली असे म्हणता म्हणता शिंदे जातिव्यवस्थेच्या भावनिक, सामाजिक, राजकीय असे एकेक पापुद्रा उलगडत शेवटी आर्थिक पायापर्यंत पोहोचतात. 

निशाताई शिवूरकरांनी "विठ्ठल रामजी शिंदे- जीवन आणि कार्य." या गो. म. पवार यांच्या साहित्य संस्कृती महामंडळाकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातील माहिती दिली. फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी प्रार्थना समाजासाठी स्वतःला वाहून घेतले. प्रार्थना समाजाकडून ते सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला ऑक्सफर्डला मँन्चेस्टर कॉलेजमध्ये  गेले. इंग्लंडहून आल्यावर त्यांनी स्वतःला अस्पृश्यता निवारणाच्या कामात वाहून घेतले. डिप्रेस्ड क्लास मिशनची तसेच मुरळी प्रतिबंधक सभेची स्थापना केली. अपृश्यता निवारण परिषद आयोजित केली. कॉंग्रेसने अस्पृश्यता निवारणाचा ठराव मांडण्यास तसेच हा ठराव पास करण्यास महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्रयत्न कारणीभूत होते. तसेच महात्मा गांधी आणि सयाजीराव गायकवाड यांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी सभा घेतल्या. ते अस्पृशांशी इतके एकरूप झाले होते की  नगरच्या भिंगार येथे वास्तव्यास असताना त्यांना लोकं महार शिंदे म्हणून ओळखत. त्यांनी वाईच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला. वायाकोम येथील सत्याग्रहात भाग घेतला. महर्षींचे काम इतके अफाट आहे की एकाच बैठकीत त्याचा संपूर्ण आढावा घेणे अशक्य आहे. त्यांच्यानंतर अस्पृश्यांसाठी इतके अफाट काम क्वचितच कोणाकडून झाले असेल.  त्यांची परित्यक्ता बहिण, तिच्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम. हिंगणे येथील महिला आश्रमात तिला नाकारलेला प्रवेश. बहिणीच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या आगळ्यावेगळ्या पैलूची त्यांनी माहिती दिली.

यानंतर शिवाजी गायकवाड विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार आणि मराठ्यांची सद्यस्थिती या विषयावर बोलले. "स्टुडन्ट्स् ब्रदरहूड" ही मराठा विद्यार्थ्यांची एक संस्था होती. तिथे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी व्याख्यान दिले होते. त्या व्याख्यानात त्यांनी जी मराठ्यांची सद्यस्थिती सांगितली आहे तिच्यात आजही फारसा फरक पडलेला नाही म्हणून हे व्याख्यान आजही अभ्यासण्यासारखे आहे. मराठा हा शब्द येथे महर्षींनी महाराष्ट्रातील बहुजन समाज या अर्थी वापरला आहे म्हणून हे व्याख्यान संपूर्ण बहुजन समाजानेच अभ्यासावे. या व्याख्यानात महर्षींनी मराठ्यांचे तीन प्रकार सांगितले आहेत. १)  एक म्हणजे स्वजातीच्या प्रेमात इतरांशी फटकून वागणारे तामसी मराठे २) दुसरे स्वजातीचा अभिमान बाळगणारे मात्र इतराशी दुरावा न ठेवणारे राजस मराठे. ३) कुठल्याही जातीचा हेवा, मत्सर न करता स्वजातीचेही हित जोपासणारे सात्विक मराठे. 

मराठे म्हणजे कुणबी, माळी, साळी, शिंपी, गवळी, न्हावी, वाणी इ जातींची संख्या १९१० च्या जनगणनेनुसार  नुसार ५० लाख, ब्राम्हणांची १० लाख तर लिंगायतांची १३ लाख. मराठे बहुसंख्य असल्याने मराठे मागासलेले राहिले तर देश मागासलेला राहील. म्हणून मराठ्यांचा विकास होणे देशाचा विकास होण्यासाठी आवश्यक आहे.  त्यामुळे शहरातील सुधारलेल्या मराठ्यांनी खेड्यापाड्यातील आपल्या बांधवांच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा. याबात ते पुढे म्हणतात की वंचितांना मदत न करणे म्हणजे चोरी करणे होय.  यासाठी ते पुढील उपाय सुचवितात.

१) शिक्षण - मुले आणि मुलींसाठी सक्तीचे शिक्षण.

२) राजकीय चळवळीत सर्व जातीच्या लोकांचा सक्रीय सहभाग.

३) बँका, उद्योगधंदे, व्यापारात सहभागी होणे.

४) लेखन, संशोधन, पर्यटन क्षेत्रात सहभाग वाढविणे. काव्य, कला, नाटक, लेखन सर्वच माध्यमांत प्राविण्य मिळविणे.

५) सामाजिक सुधारणांत योगदान देणे.

६) महिलांना बरोबरीचे स्थान देणे.

७) निष्ठा व नम्रता वागण्या बोलण्यात कायम ठेवणे.

८) आता शस्त्रांचे युद्ध संपले आहे. त्यामुळे गतकाळाच्या आठवणी काढत बसण्यापेक्षा आता तलवारी सोडून लेखण्या हाती घ्याव्यात. 

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेले हे मार्गदर्शन आजदेखील उपयोगी आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नानक नाम जहाज है.