संत साहित्य आणि समाज
संत साहित्य आणि समाज
दिनांक १५ जुलै २०२२ रोजी 'कडेपठार बंगला' सायखिंडी फाटा प्रा. प्रवीण मेहेत्रे यांच्या निवास्थानी मैत्री सद्भावना ग्रुपची बैठक पार पडली. या बैठकीस डॉ अमित शिंदे, प्रवीण मेहेत्रे, शिवाजी गायकवाड, निशा शिवूरकर, सीमा मालाणी, मीरा मेहेत्रे, वीणा मेहेत्रे, रेणुका मेहेत्रे, संदीप मेहेत्रे, अंतून घोडके आणि प्रा. सुशांत सातपुते उपस्थित होते.
नुकतीच आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा होऊन गेलेली असल्याने त्या दिवशी संत साहित्यावर चर्चा करण्यात आली.
सर्वप्रथम सीमा मालाणी यांनी लोकसत्ता मधील स्त्री संतांविषयीच्या 'न व्हावे उदास' या लेखाचे वाचन केले.
तेराव्या शतकात वारकरी संप्रदायात स्त्रियांनी बरोबरीचे स्थान मिळवून अभंगरचना करून अनेकदा क्रांतिकारी भूमिका घेतली होती. 'भेदाभेद भ्रम अमंगळ' हे ब्रीदवाक्य असलेल्या वारकरी संप्रदायात विविध जाती, धर्मातील स्त्री पुरुष संत होऊन गेले. 'स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास.' या ओळी अक्षरशः जगणाऱ्या अनेक स्त्री संतांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पुरुष संतांच्या घरातील स्त्रिया वारकरी संप्रदायात ओढल्या गेल्या, त्यांनी या चळवळीचे नेतृत्व केले आणि पुरुष संतांनीही याकामी आपल्या घरातील स्त्रियांना विरोध न करता उलट प्रोत्साहन दिले ही बाब वारकरी पंथात स्त्री पुरुष समानतेचे तत्व रुजले होते हे दाखविण्यास पुरेशी आहे.
संत मुक्ताई यांनी ताटीच्या अभंगातून प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांना आलेल्या नैराश्यातून बाहेर काढले.
योगी पावन मनाचा।साही अपराध जनाचा ॥१॥
विश्व रागें झाले वन्ही। संती सुखें व्हावें पाणी ॥२॥
शब्द शस्त्रं झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥३॥
विश्व पट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
असे सांगून त्यांनी 'या पंथात संतांचे कार्य काय?' याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. मुक्ताई त्या वेळेस बारा वर्षांच्या असाव्यात. इतक्या कमी वयातील धाकट्या बहिणीचा उपदेश वयाने, ज्ञानाने, अधिकाराने मोठे असूनही ज्ञानेश्वरांनी ऐकून घेतला इतकेच नव्हे तर त्या नुसार वर्तन केले. पुढे याच मुक्ताबाई चांगदेव योग्यांच्या गुरु झाल्या.
अखंड जयाला देवाचा शेजार ।
कारे अहंकार नाही गेला ।।असा परखड प्रश्न त्या विचारतात.
चोखोबांच्या पत्नी संत सोयराबाई यांनीही सशक्त अभंग रचना केल्या आहेत. एकतर जातीने महार, त्यात स्त्री, यावरून त्यांचे सामाजिक स्थान त्याकाळी काय असेल याची कल्पना करता येते. तरीही आपल्या प्रतिभेने त्यांनी आपल्या समोरील सामाजिक उतरंडीचे आव्हान पेलून दाखविले. त्यांचा 'अवघा रंग एकची झाला.' हा अभंग तसेच विटाळाचे अभंग लोकप्रिय आहेत. आजही पाळीच्या काळात स्त्रीने देवदर्शन घेऊ नये असा संकेत अनेक कर्मठ धर्मांध हट्टाने पाळत असतात. त्या काळात त्यांनी 'विटाळ हा देहाला असतो मात्र आत्म्याला तो स्पर्श करत नाही.' ही भूमिका मांडून विटाळप्रथेचा निषेध केला आहे.
याशिवाय संत चोखोबांच्या बहीण संत निर्मळा यांनी सुद्धा काव्यरचना केलेली आहे. संत नामदेवांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्वतंत्र काव्यरचना केली. त्यात त्यांची आई गुणाई, पत्नी राजाई, बहीण आऊबाई , सून, पुतणी इ. सर्वच स्त्रिया संत आणि कवयत्री होत्या. जनाबाई नामदेवांची दासी म्हणून काम करत. त्यांना संतपरंपरेत अतिशय मानाचे स्थान मिळाले होते. ज्या नामदेवांच्या घरी त्या दासी होत्या त्याच नामदेवांच्या घरी त्या सर्व संतांच्या मांदियाळीत मानाने बसत होत्या. वर्गभेदाविरुद्ध वारकरी संप्रदायाने घेतलेल्या भूमिकेमुळेच हे शक्य होऊ शकले.
आज एकविसाव्या शतकात देखील आपल्या घरातील स्त्रियांनी काय परिधान करावे, काय काम करावे इ. बंधने टाकली जातात. स्त्रियांची समजले जाणारी कामे जनाबाईसाठी साक्षात विठ्ठल करत असे असे सांगण्यात येते. दळण, कांडण, झाडलोट ही कामे जर विठ्ठल करतो तर पुरुषांनी ती कामे करण्यात कमीपणा तो काय? आजही घरकाम हे केवळ स्त्रीचे काम आहे असे समजणारे पुरुष आढळतात. त्यांना ही प्रदीर्घ परंपरा समजायला हवी
तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई सिऊरकर (या खऱ्या शिवूरकर आहेत अशी दुरुस्ती निशा शिवूरकर यांनी केली.) यांचा ज्ञानदेवे रचला पाया ... ही रचना प्रसिद्ध आहे. या अभंगात वारकरी संप्रदायाची ध्वजा आपल्या खांद्यावर आहे असा आत्मविश्वासपूर्वक उल्लेख बहिणाबाईंनी केला आहे.
यानंतर डॉ. अमित शिंदे बोलले. 'आमच्या घरी पूजा आहे, पाळी लांबविण्याच्या गोळ्या द्या,' अशी मागणी डॉक्टरांकडे नेहमी होत असते. मागे काही मंदिरांत स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन झाले होते. त्यावेळी 'हा उगाच प्रसिद्धी मिळविण्याचा स्टंट आहे.' असे मत अनेक सुशिक्षितांनीही व्यक्त केले होते. अजूनही पाळीच्या काळात अनेक ठिकाणी स्त्रिला स्वयंपाक करू दिला जात नाही.
या पार्श्वभूमीवर विटाळाचे अभंग लिहिणारी चोख्याची महारी संत सोयराबाई उठून दिसते. खरेतर संत चोखामेळा यांचेही काही अभंग विटाळाचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. विटाळ या शब्दाचे अनेक अर्थ होतात. अस्पृश्यता, मासिक पाळी, अमंगळ या वेगवेगळ्या अर्थाने हा शब्द वापरला जातो. चोखोबांच्या अभंगात विटाळ हा शब्द अस्पृश्यता या अर्थाने आलेला आहे.
वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ । पुराणें अमंगळ विटाळाचीं ॥१॥
जीवासी विटाळ शिवासी विटाळ । काया अमंगळ विटाळाची ॥२॥
ब्रम्हिया विटाळ विष्णूसी विटाळ । शंकरा विटाळ अमंगळ ॥३॥
जन्मतां विटाळ मरतां विटाळ । चोखा म्हणे विटाळ आदिअंती ॥४॥
पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥
तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण । विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥
आदिअंती अवघा विटाळ संचला । सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥
चोखा म्हणे मज नवल वाटतें । विटाळा परतें आहे कोण ॥४॥
नीच लोकांच्या संगतीने देव देखील विटाळतो. मग त्याला पाण्याने धुवून शुद्ध करतात. पण खरे पाहता विटाळ पाळणारा देव असो, वेद असो, शास्त्र असो हे सर्व अमंगल आहेत. सर्व जग हे पाच महाभूतांच्या मेळानेच बनले आहे. तेथे कसले आले आहे सोवळे ओवळे? असे सांगून देह हेच विटाळाचे कारण आहे असे चोखोबांनी सांगितले.
सोयाराबाईंनी हा विचार आणखी पुढे नेला. विटाळ (पाळी ) तर निर्मितीचे आदिकारण आहे हे त्या स्पष्टपणे नोंदवतात.
देहासी विटाळ म्हणती सकळ।
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध।।
देहींचा विटाळ देहींच जन्मला।
सोवळा तो झाला कवण धर्म।।
विटाळ वांचोनी उत्पत्तेचे स्थान।
कोणा देह निर्माण नाही जगी।।
म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी।
विटाळ देहांतरी वसतसे।।
देहाचा विटाळ देहीच निर्धारी।
म्हणतसे महारी चोखियाची।।
विटाळ हा देहाला असतो पण आत्मा हा 'बुद्धस्वरूप' आहे. (यावरून सोयाराबाईंची बुद्धाविषयी आस्था प्रकट होते.) विटाळावाचून उत्पत्ती / जन्म होऊ शकत नाही. देहाचा विटाळ देहापुरता मर्यादित आहे तो आत्म्याला स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे विटाळ अवस्थेतही स्त्री अपवित्र होत नाही हा विचार त्या काळी मांडणे हे खरोखर क्रांतिकारी होते.
आजही बी बी सी ने वारीतील स्त्रियांशी पाळीतील समस्यांबद्दल संवाद साधला असता वारीच्या काळात विटाळाची बंधने पाळली जात नाहीत असे बहुतांश स्त्रियांनी सांगितले. मात्र वारीतील स्त्रियांना सोयीचे व्हावे म्हणून सॅनिटरी पॅड वाटण्याची मोहीम हाती घ्यायला हवी असे सर्वानुमते ठरले.
यावर वीणा मेहेत्रे यांनी अलीकडे हे विटाळ पाळण्याची पद्धत खेड्यातही खूप मोठ्या प्रमाणावर पसरत आहे असे सांगून कुरडया पापड करताना, लोणचे करताना, दिवाळीचा फराळ करताना विटाळशी स्त्रीचा हात लागू देत नाहीत किंवा आजारी माणसावर त्यांची सावली देखील पडू दिली जात नाही. पूर्वी ही पद्धत श्रमिक वर्गात पाळली जात नव्हती मात्र हल्ली हे प्रमाण वाढत आहे असे निरीक्षण मांडले.
पुढील वर्षांपासून आपण संत सोयराबाई यांच्या नावे वारीत सॅनिटरी पॅड वाटण्याचा प्रकल्प हाती घ्यावा असे ठरले.
यानंतर निशा शिवूरकर यांनी लल्लेश्वरी या काश्मिरी संतांविषयी माहिती सांगितली. काश्मीर ही बहू सांस्कृतिक भूमी. लल्लेश्वरी यांचा जन्म १३२० मधील पाम्पोर जवळील एका ब्राम्हण शेतकरी कुटुंबात झाला. बाराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. पुढे सासुरवास असह्य झाल्यामुळे त्यांनी घर सोडून सन्यस्थ जीवन स्वीकारले. गुरु सिद्ध श्रीकांत यांच्याकडून दीक्षा घेतली. भटकंती हेच त्यांचे जीवन बनले. त्यांनी कपड्यांचाही त्याग केला. त्यांच्या रचना वाख म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी स्वतः लोखं केले नाही. त्यांच्या रचना मौखिक परंपरेतून सर्वत्र पसरल्या. त्यांना काश्मिरी भाषेची जणांनी समजले जाते. काश्मीरच्या रोजच्या व्यवहारात, भाषेत त्यांची अनेक वचने म्हणी वाक्प्रचाराप्रमाणे सहज वापरली जातात.
त्यांच्या रचना या भक्तिरसाने ओथंबलेल्या आहेत. शैव पंथीय असून त्यांना पंथाची मर्यादा नाही. हिंदू मुस्लिम दोन्ही समजत त्यांचे अनुयायी आढळतात. मुस्लिम त्यांना लल अरिफा म्हणतात.
आई सीधी राह से, गई न सीधी राह।
सुषुम-सेतु पर खड़ी थी, बीत गया दिन आह!
जेब टटोली, कौड़ी न पाई।
माझी को दूँ, क्या उतराई?
प्रेम आणि ईश्वराशी एकरूपतेतून मुक्ती मिळविण्याची त्यांची अध्यात्मिक जाणीव काश्मिरींच्या मानत रुजली आहे.
यानंतर प्रा. प्रवीण मेहेत्रे यांनी रामकृष्ण परमहं यांच्या पत्नी सारदादेवी यांच्याबद्दल माहिती सांगितली. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यानंतर लवकरच रामकृष्ण परमहंस यांनी ब्रह्मचर्य दीक्षा घेतली. त्यामुळे त्यांनतर त्यांचे व रामकृष्णांचे नाते हे पतिपत्नीचे न राहता. आई आणि मुलांचे अधिक बनले. त्या सोळा वर्षांच्या असताना रामकृष्ण परमहंस यांनी त्यांची पूजा करून त्यांच्यात देवीचे स्वरूप पहिले. रामकृष्णांचा शिष्य निखिलानंद यांनी सारदादेवींची वचने संग्रहित केली आहेत.
प्रा. प्रवीण मेहेत्रे यांच्या आई मीरा मेहेत्रे यांनी ज्ञानेश्वरी वाचनातून त्यांना समाधान मिळते असे सांगितले. सामाजिक छळामुळे ज्ञानेश्वरांना पैठण सोडावे लागले याबाबत त्यांना वाईट वाटते असे त्यांनी सांगितले.
आंतून घोडके यांनी स्त्रियांनी स्त्रियांची कामे केलीच पाहिजेत तरच कुटुंब सुखी होईल असे मत त्यांनी मांडले. त्यावर आजच्या चर्चेचा हा विषय नाही, याविषयावर पुढच्या मिटिंग मध्ये चर्चा करू असे ठरले.
यानंतर शिवाजी गायकवाड यांनी कबीरांचे काही दोहे वाचले.
साई इतना दिजिये ! जामे कुटुंब समाये
मै भी भूका ना रहू... साधू न भूका जाये!
या दोह्यातून त्यांनी शोषणरहित अर्थव्यवस्था आणि असंग्रहावर भाष्य केले आहे.
पत्थर पूजे तो हरी मिले ,मै पुजू पहाड
ताते ये चाकी भली, पीस खाये संसार
यातून त्यांनी मूर्तिपूजा आणि कर्मकांडावर कोरडे ओढले
त्याच बरोबर
मुल्ला होकार बांग पुकारे ... क्या तेरा साहिब बहेरा है भाई !
चीटी पाव मी नेवर बांधे तो भी साहिब सुनता है रे भाई !!
असे म्हणून इस्लाममधील प्रथांवरही टीका केली आहे.
त्यानंतर मौको कहा धुडे है रे बंदे मै तो तेरे पास मे... हे गाणे वाजविण्यात आले.
ईश्वर हा मंदिर मस्जिद यापासून दूर, आपल्या मनात वासतो. त्यामुळे धर्माच्या नावावर भांडणे व्यर्थ आहे. असे भांडणारे लोक ईश्वराला ओळखूच शकत नाही हा संदेश या गीतातून कबीरांनी दिला आहे.
मात्र आपण सर्व संतांचा हा संदेश विसरलो. धर्म पाळणे म्हणजे इतर धर्मियांना वाईट म्हणणे, माझाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे असा अभिनिवेश बाळगणे, समोरचा चुकीचा वागतो म्हणून मी त्याच्यापेक्षा जास्त चुकीचे वागेन अशी स्पर्धा करणे असाच बहुतेकांचा समाज झाला आहे. त्यामुळे या देशातील धर्माधर्मांमधील भेद वाढत आहेत. राजकीय स्वार्थासाठी राजकारणी याला खतपाणी घालत आहेत. परधर्मियांना धडा शिकविला नाही तर ते तुमचा धर्म नष्ट करतील. तुमचा धर्म खतऱ्यात आहे, अशा प्रकारच्या दुष्प्रचाराला लोक बाली पडत आहेत. धर्माच्या खऱ्या अर्थापासून दूर जात आहेत. ही खंत सर्वांनीच व्यक्त केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा