स्वराज्य जननी जिजाऊ आणि थोर सुधारक गोपाळ गणेश आगरकर
|
गो. ग. आगरकर आणि स्वराज्यसंकल्पिका जिजाऊ स्मरण "मी कधीही वटसावित्रीची पूजा करत नाही." इतकेच साधे विधान सोशल मीडियावर करणाऱ्या एका मोठ्या पदावरील स्त्रीला परवा अश्लील भाषेत ट्रॉल केले गेले. "नो बिंदी, नो बिझनेस." अशी कॅम्पेन मध्यंतरी चालविण्यात आली. पुरुषांसाठी मात्र "नो धोती, नो बिझनेस" अशी कुठलीही मोहीम राबविण्यात आली नाही. एकूणच आजही परंपरा पाळण्याची जबाबदारी स्त्रियांवर टाकण्यात येते. सोशल मीडियाच्या उदयानंतर जुन्या प्रथा आणि रूढी यांना हळूहळू, क्रमाक्रमाने ग्लोरिफाय करण्याची मोहीम जोरात सुरु झाली. अशा वातावरणात पतिनिधनानंतर सती न जाता हिंदवी स्वराज्याची ब्लुप्रिंट बनविणाऱ्या राजमाता जिजाबाई आणि स्रियांना रूढींच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणारे सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा स्मृतिदिन एकाच दिवशी यावा हा विलक्षण योगायोग आहे. काल दिनांक १७ जून २०२२ रोजी मैत्री
सद्भावना ग्रुपची पाक्षिक बैठक आर्किटेक्ट अमोल सांगळे यांच्या घरी पार पडली. त्यात
शिवाजी गायकवाड, विनोद भोईर, माया भोईर, अमोल सांगळे, डॉ अमित शिंदे, अंतून घोडके,
सीमा मालानी हे उपस्थित होते
या प्रसंगी थोर समाज
सुधारक गोपाल गणेश आगरकर आणि मां जिजाऊ यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांच्याविषयी
चिंतन करण्यात आले. अमोल
सांगळे स्वराज्य
संकल्पिका जिजाऊ मासाहेबांच्या व्याक्तीमत्वाविषयी बोलले, जिजाऊ, ताराबाई
राणीसाहेब, 'सखी राज्ञीर्जयती' असा शिक्का वापरणाऱ्या येसूबाई राणीसाहेब
यापैकी कोणीही पतिनिधनानंतर सती गेल्या नाहीत. शिवकुळात तसेच नंतरही मराठेशाहीत सती जाण्याच्या घटना जवळजवळ नाहीतच. या सर्व स्त्रिया राज्यकारभारात
सक्रिय भाग घेत असत. जिजाऊंनी दोन छत्रपती घडविले इतकेच केवळ त्यांचे कर्तृत्व नाही तर जिजाऊ आणि शहाजी राजे यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. त्यामुळेच बारा वर्षांचे शिवाजी महाराज बंगळूरवरून पुण्यात आले
तेव्हा शहाजी महाराजांनी त्यांना राजमुद्रा, छत्र, अमात्य इ मंत्रिमंडळ
बरोबर दिले होते. महाराष्ट्रात जिजाऊंनी आणि दक्षिणेत शहाजी राजांनी
स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा हे ठरवूनच जिजाऊंवर पुणे जहागिरीची
जबाबदारी दिली गेली होती. बारा वर्षाच्या मुर्तजा निजामशहाला मांडीवर घेऊन
शहाजी राजांनी स्वराज्य निर्मितीचा पहिला प्रयोग केला होता. शिवाजी
महाराजांनी दुसरा यशस्वी प्रयोग केला तर व्यंकोजी राजांनी तंजावर येथे
स्वराज्य निर्मितीचा तिसरा प्रयोग केला होता. जिजाऊ आणि बाळ शिवाजीराजे पुण्याला आले तेव्हा मुरार जगदेवाने पुणे शहर उध्वस्त केल्यानंतर तिथे गाढवाचा नांगर फिरवून वेशीवर उलटी पहार खुपसून त्यात वहान (चप्पल) अडकवली होती. ही कृती त्या शहराला अपशकुनी घोषित करण्याची होती. मात्र या अंधश्रद्धेला बळी न पडता जिजाऊ मासाहेबांनी न भिता ती वहान फेकून दिली आणि राज्य अंधश्रद्धेवर नाही तर स्वकर्तुत्वावर उभे राहते असा संदेश दिला. जिजाऊ पुण्याचा कारभार स्वतंत्रपणे आणि समर्थपणे पाहत. पुढेही अनेकदा शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत जिजाऊंनी स्वराज्याचा कारभार प्रसंगी हातात घेतला होता. अनेक युद्धयोजना शिवाजी महाराजांनी जिजामातेच्या मसलतीनेच राबविल्या. स्वराज्यातील त्या सुप्रीम कोर्ट होत्या. छत्रपतींचे अनेक कठोर निर्णय त्यांनी बदलायला लावले होते जिजाऊंच्या व्यक्तिमत्वात असे कर्तबगारी आणि वात्सल्याचे अलौकिक मिश्रण होते. |
सीमा मालानी यांनी निशा शिवूरकर यांनी ‘अर्धे आकाश’ या सदरासाठी लिहिलेल्या आगरकरांविषयीच्या लेखाचे वाचन केले. या लेखात आगरकरांचे जीवन, विचार आणि कार्य यांविषयी संक्षिप्त आढावा घेण्यात आला. केसरीचे संपादक असताना त्यांचे अग्रलेख राजकीय विषयांपेक्षा सामाजिक सुधारणांकडे अधिक झुकू लागल्याने त्यांचे टिळकांशी मतभेद झाले आणि त्यांनी ‘सुधारक’ हे स्वतंत्र नियतकालिक काढले. त्यांना लाभलेले अल्पायुष्य, त्यांच्या पत्नीची झालेली ससेहोलपट, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी यशोदाबाई यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, त्यांनी केलेले प्रसूती संबंधित समाजकार्य या काही अपरिचित पैलूंची यानिमित्ताने माहिती झाली.
यानंतर सीमाताईंनी अरुणा ढेरे यांच्या ‘विवेक आणि विद्रोह’ या पुस्तकातील आगरकरांचे बंधू यांच्याविषयीच्या लेखाची माहिती दिली. आगरकरांचे बंधू कीर्तनकार होते, आगरकरांच्या हयातीत त्यांचा दृष्टीकोन काहीसा सुधारक होता. मात्र तरीही त्यांच्यात परंपरावादी विचारांपासून मुक्ती मिळविण्याची हिंमत निर्माण होऊ शकली नाही आणि आगरकरांच्या मृत्युनंतर त्यांनी याशोदाबाईंना केशवपन करण्याचा आग्रह केला. या निमित्ताने धर्म म्हणजे काय? श्रद्धा की नैतिकता यांचा काहीसा उहापोह या लेखात आहे.
यानंतर माया भोईर आणि विनोद भोईर यांनी लिहिलेले टिपण विनोद भोईर यांनी वाचून दाखवले. त्यांनी आगरकरांच्या समग्र चरित्राचा थोडक्यात आढावा घेतला. आगरकरांवर असलेल्या स्पेन्सर, मिल, हक्सले आदी विचारवंतांचा आणि तत्वाज्ञांचा प्रभाव आणि त्यामुळे विकसित झालेली बुद्धिवादी विचारधारा यांचा उहापोह केला, त्यांच्या जिवंतपणी काढल्या गेलेल्या अंतयात्रेचे वर्णन केले. तसेच य.दि. फडके यांनी लिहिलेल्या ‘व्यक्ती आणि विचार’ या पुस्तकातील काही नोंदींचा उल्लेख केला. यावरून आपल्या विचारधारेशी प्रामाणिक राहण्यासाठी त्यांनी किती धैर्य दाखविले आणि छळ सोसला हे सर्वांना दिसून आले.
डॉ अमित शिंदे यांनी ‘आगरकरांचे निवडक लेख आणि डोंगरीतील तुरुंगातील १०१ दिवस’ या एकत्रित पुस्तकाचा संदर्भ दिला. या पुस्तकात आगरकरांचे ‘सुधारक’ या नियतकालिकातील निवडक लेख दिलेले आहेत. त्यात सुधारक काढण्याचा हेतू, ‘आमचे पुढे काय होणार?’ हा राजसत्ता, धर्मसत्ता, समाज, कुटुंबसंस्था यांचा ऐतिहासिक धांडोळा घेऊन भविष्याविषयी काही भाकिते वर्तविणारा लेख, ‘तरुण सुशिक्षितांस विज्ञापना’, ‘सोवळ्याची मीमांसा’, ‘विवाह निराकरण अथवा घटस्पोट’, ‘प्रियाराधन’, ‘वल्लभोपासना’, (सुधारक आपली स्वतंत्र) ‘जात का करत नाहीत?’ ‘शिक्षणाबद्दल सक्ती करावी का?’ ‘“प्राथमिक शिक्षण” सरकारचे आवश्यक कर्तव्य’, ‘स्त्री पुरुषांना एकच शिक्षण द्यावे आणि तेही एकत्रच’, ‘स्त्रियांस चरीथार्थसंपादक शिक्षण देण्याची आवश्यकता’ इ. व यासारख्या इतर लेखांतून आगरकरांचा कालातीत प्रगत दृष्टीकोन, त्यांना झालेले ट्रोलींग आणि आजच्या काळातील जातीयवादी झुंडींच्या उन्मादाशी त्याचे साम्य तसेच आगरकरांची शांत, संयमी, चिकित्सक, मुद्देसूद शैली याबद्दल उहापोह केला.
शिवाजी गायकवाड यांनी “आगरकर वाङमय” या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित पुस्तकाचा हवाला देत आगरकरांना समाजसुधारणे इतकेच ममत्व स्वातंत्र्य चळवळीबद्दलही होते असे सांगत आगरकरांच्या ‘इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही’ या लेखाचा उल्लेख करत भारताच्या गरीबीचे अर्थशास्त्रीय विश्लेषण आगरकरांनी केले आहे असे सांगितले. किमान आवश्यक उत्पन्नापेक्षा भारतीयांचे सरासरी उत्पन्न ३ रुपये कमी आहे. तुरुंगातील कैद्यांवर प्रत्येकी खर्च होणार्या पैशांइतकेही उत्पन्न सरासरी भारतीय कमवत नाही हे सांगत आणि ब्रिटीश व्याक्ती आणि भारतीय व्यक्ती यांतील आयुर्मानातील तफावत दाखवत ते ब्रिटीश सरकारवर टीका करतात.
केतकर नावाच्या व्यक्तीच्या पत्नीच्या आत्महत्येच्या निमित्ताने ते तत्कालीन वर्तमानपत्रकर्त्यांची सती प्रथेच्या उदात्तीकरणाबद्दल कानउघाडणी करतात. तसेच भारतीय माणसाच्या अंगात मुरलेल्या लबाड वृत्तीचा उल्लेख करून भारतीयांच्या गरिबीला ते स्वतःही कसे जबाबदार आहेत हे सांगून भारतीयांनाही आरसा दाखवतात.
अशा प्रकारे या बैठकीत झालेली चर्चा सध्याच्या प्रतिगामी शक्तींच्या उन्मादाच्या काळात बळ देणारी आहे. बैठक समाप्त झाली तेव्हा पुढील बैठकीत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी चर्चा करायचे ठरले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा